MHADA Lottery 2024: प्रत्येकाचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा आणि सिडकोने अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व प्रादेशिक विकास प्राधिकरणाने पुणे जिल्ह्यात परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी काढली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी एक खूशखबर सुद्धा आहे. म्हाडा द्वारे लवकरच 13 हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर मुंबई, पुणे, किंवा ठाण्यामधे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचलीच पाहिजे.
तुम्ही जर पहिल्यांदाच म्हाडासाठी अर्ज करत असाल तर हे लक्षात ठेवा
सर्वसामान्यांच्या मनात म्हाडाचा अर्ज भरताना अनेक प्रश्न निर्माण होत असतात. जर काही चूक झाली तर फॉर्म नाकारण्यात येतो. अशा परिस्थितीत म्हाडाच (MHADA Lottery 2024) घर घेण्याच त्यांच असलेलं स्वप्न सुद्धा अधुरच राहतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हा म्हाडाचा अर्ज भरताना नेमका कसा भरावा आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सांगणार आहोत.
अर्ज कसा कराल?
housing mhada gov in हे म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सगळ्यात आधी या वेबसाइटवर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. आधार आणि पॅन कार्डची या नोंदणीसाठी आवश्यकता असेल. या नोंदणीमध्ये तुम्हाला इतर माहिती सुद्धा द्यावी लागणार आहे. हे सर्व केल्यानंतर तुम्ही म्हाडासाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहात.
फॉर्म भरतानाच्या महत्वाच्या गोष्टी
म्हाडासाठी अर्ज करताना, प्रथम तुम्हाला कोणत्या कोट्यातून आणि गटातून फॉर्म भरायचा आहे ते ठरवा. कारण सर्वांना न्याय मिळावा, अशा पद्धतीने म्हाडामधे (MHADA Lottery 2024) विभागणी करण्यात आली आहे. त्यात पत्रकार कोटा, स्वातंत्र्यसैनिक, डॉक्टर इत्यादी अनेक श्रेणी आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पगाराच्या उत्पन्नानुसार योग्य त्या गटामध्ये अर्ज करायचा आहे.
म्हाडाच्या अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
रद्द केलेला चेक
पत्त्याचा पुरावा
ड्रायव्हिंग लायसन्स
आयडी फोटो
जन्म प्रमाणपत्र
अर्जदाराचे संपर्क तपशील
म्हाडात (MHADA Lottery 2024) घरासाठी कोण अर्ज करू शकतो?
म्हाडासाठी 18 वर्षांवरील कोणताही नागरिक अर्ज करू शकणार आहे. शिवाय, त्यांचे महाराष्ट्रातील वास्तव्य किमान 15 वर्षाचे असावे. म्हाडासाठी अर्ज करताना अनेकांना अडचणी येतात. या प्रकरणात, आपण आपल्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी 02226598924/9834637538 वर संपर्क करू शकता, याशिवाय 18004250018 या नंबर वर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता.
जर तुमचे नाव लॉटरीत दिसले तर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. कागदपत्रे नसल्यास म्हाडा सुरुवातीला वेळ देत होता. मात्र, नव्या नियमांनुसार, तुम्हाला दिलेल्या तारखेपर्यंत सर्व कागदपत्रे जमा करणं आवश्यक आहे.
फॉर्म भरताना या चुका करू नका
आपले नाव, पत्ता आणि कामाशी संबंधित माहिती योग्यरित्या प्रविष्ट करा. कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान काही तफावत आढळल्यास, तुमचा फॉर्म रद्द करण्यात येईल. नोंदणी आणि पेमेंट पावत्या डाउनलोड करून त्या सुरक्षित ठेवा. या पावत्या गमावल्याने तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. म्हाडासाठी फाईल बनवताना नेहमी चार फाइल बनवा. एक बँकेत देण्यासाठी, दुसरी म्हाडाच्या कार्यालयासाठी आणि दोन स्वतःसाठी… कारण म्हाडात फायली गहाळ झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
म्हाडाचे (MHADA Lottery 2024) घर न मिळाल्यास अर्जदाराने जी रक्कम भरलेली असेल ती सात दिवसांत परत करण्यात येईल. हे तुम्ही म्हाडाच्या वेबसाइटवर लॉगिन करून सुद्धा तपासू शकता.
येथे वाचा – जुलै-सप्टेंबरमधे सोयाबीनचे भाव वधारणार.. पहा जिल्ह्यांनुसार भाव..