सध्या सगळीकडेच सोयाबीन पीक त्याच्या वाढीच्या अवस्थेत असून सध्या रिमझिम पावसाचे आणि ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे असे वातावरण पुढील काही दिवस असेच राहिल्यास सोयाबीनवर स्पोडोप्टेरा या लष्करी अळीचा प्रादुर्भाव सुद्धा होऊ शकतो. स्पोडोप्टेरा या लष्करी या अळीला तंबाखू वरील पाने खाणारी अळी म्हणून ओळखले जाते. शेतकर्यांनी वेळीच यावर उपाय योजना केल्या नाही तर सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर किडीचा प्रादुर्भाव ओळखून उपाययोजना केल्या पाहिजे. असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामधील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ञांनी केले आहे.
उपाययोजना काय कराव्या?
(1) पीक सुरुवातीच्या अवस्थेत असताना त्याला तणमुक्त ठेवावे.
(2) बांधावर आढळणार्या किडीचे पुरक खाद्य वनस्पतीचा नाश करावा.
(3) जे किडग्रस्त झाडे, पाने आणि फांद्या असतील त्यांचा नायनाट करावा.
(4) सुरवातीच्या अवस्थेतील अळीग्रस्त पाने आणि अळीची अंडी असणारी पाने अलगद तोडून घ्यावी आणि त्याचा किडीसह नाश करावा.
(5) हिरवी घाटेअळी आणि तंबाखुची पाने खाणारी अळी या किडीची प्रादुभावाची पातळी समजून घेण्यासाठी प्रत्येक किडीसाठी प्रती एकर 2 कामगंध सापळे शेतामध्ये लावावे.
(6) तसेच शेतामध्ये इंग्रजी मधील T या अक्षरासारखे प्रति एकरी 20 पक्षी थांबे तयार करावे.
(7) तंबाखूवरील पाने खाणाऱ्या स्पोडोप्टेरा या अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी S.L.N.P.V. 500 L.E. विषाणू 400 मि.ली. किंवा नोमुरिया रिलाई या जैविक बुरशीची 800 ग्रॅम प्रति एकरी अशी फवारणी प्रादुर्भाव आढळून आल्यास ताबडतोब करावी.
पाने खाणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे?
(1) पाने खाणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन 1500 पीपीएम 500 मिली प्रती एकर अशी फवारणी करावी.
(2) पिकांचे नियमित सर्वेक्षण करत रहावे. जर किडींने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर प्रोफेनोफॉस 50 टक्के 400 मिली किंवा इथिऑन 50 टक्के 600 मिली किंवा थायमिथाक्झाम 12.6 टक्के अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के (पूर्व मिश्रीत किटकनाशक) 50 मिली किंवा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर क्लोराट्रानिलीप्रोल 18.5 टक्के 60 मिली प्रती एकर असे फवारावे.
(3) किटकनाशकांची फवारणी करत असताना ती आलटून-पालटून करावी. तसेच एका वेळी एकाच किटकनाशकाची फवारणी करावी. वर सांगितलेले किटकनाशक सोयाबीनवर असणार्या दोन्ही प्रकारच्या किडींचे व्यवस्थापन करतात.
(4) महत्त्वाचं म्हणजे वरील कीटकनाशकाची फवारणी करत असताना त्यासोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म मूलद्रव्ये, विद्राव्य खते तसेच रसायने मिसळू नका.
(5) जर मिसळून फवारणी केली तर पिकाला अपाय होऊ शकतो आणि कीडनाशकांचा अपेक्षित परिणाम देखील दिसून येणार नाही. त्यामुळे त्यांची आवश्यकता असल्यास वेगळी-वेगळी करून फवारावी. एक कीटकनाशक लागोपाठ फवारू नका..
अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ₹6000 जमा.. येथे क्लिक करून बघा लाभार्थी यादी…
(6) वर सांगितलेल्या किटकनाशकाचे प्रमाण हे सर्व प्रकारच्या फवारणी पंपासाठी आहे. आणि त्याचे एकूण प्रमाण प्रती एकर यानुसार वापरावे. फवारणी करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. तसेच पाण्याचे प्रमाण हे शिफारसितच वापरावे. जर कमी पाण्याचा वापर केल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येणार नाही. हे लक्षात घ्या..
(7) किडनाशकांची फवारणी करत असताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घेण्यात यावी, असं महत्त्वाचं आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आलं आहे. तसेच अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी संपर्क करू शकता. दुरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९०००
तसेच पिकावर कोणतीही फवारणी करण्यापूर्वी अनुभवी व तज्ञ व्यक्तीचा सल्ला नक्की घ्यावा..